जळगाव, संग्रामपूर पंचायत समितीच्या सभापतीपदांची २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार होती. येथील सभापतींनी त्यांचे राजीनामे दिले होते. ते मंजूर झाल्याने प्रशासनाने २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता पंचायत समिती सभागृहात विशेष सभा आयोजित केली होती. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणचा कारभार हा सध्या उपसभापतीच पाहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
याव्यतिरिक्त आरक्षणातील तांत्रिक अडचणींमुळे बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट व नांदुरा तालुक्यातील नारखेड येथील ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक ही २६ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर ठरली होती. देऊळघाटमध्ये तर सुधारित अनुसूचित जाती संवर्गाचा एकच सदस्य असल्याने सरपंचाची निवडणूक केवळ औपचारिकता होती. मात्र, या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकांनाही तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळे फिल्डिंग लावलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर, फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात तीन टप्प्यांत सरपंचांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी ग्रामीण भागही ढवळून निघाला होता. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण अधिक गतिमान झाले नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. नाही म्हणायला प्रशासकीय पातळीवर तूर्तास ग्रामपंचायतीसह तत्सम निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, असे मत व्यक्त केले जात होते. यासोबतच अन्य कारणेही कोरोनाचे संक्रमण वाढण्यास कारणीभूत आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी ठरवून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन गरजेचे आहे.