चिखली नगर परिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या नेमणुकीसाठी यापूर्वी २१ जानेवारी रोजी पालिकेच्या सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आली होती. यामध्ये पाच विषय समितीच्या सभापतीपदापैकी चारच समितीच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल झाले होते. त्यातही एकपेक्षा अधीक अर्जावर सुचक व अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या असल्याने या बैठकीत केवळ दोनच विषय समितीच्या सभापतीपदाची निवड झाली होती. तथापि, भाजपा नगरसेवकाने काँग्रेस नगरसेवकांच्या पाठिंब्याने सभापतीपद मिळविले होते. यावरून ही बैठक चांगलीच गाजली होती. आता नव्याने स्थायी व विषय समित्यांच्या नेमणुकीसाठी २५ फेब्रुवारी रोजी पालिका सभागृहात सकाळी ११ वाजता 'ऑनलाइन' विशेष सभा आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. या विशेषसाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी भूसंपादन (इ.व द.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विषय समिती व स्थायी सदस्यांचे नामनिर्देशन, सभापती पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये विषय समित्यांच्या सदस्यांचे नामनिर्देशन करणे, सभापती पदाकरिता नामनिर्देशन दाखल करणे व नामनिर्देशनपत्राची छाननी, नामनिर्देशित उमेदवाराची यादी वाचून दाखविणे, उमेदवारी अर्ज मागे घेणे, उमेदवारी मागे घेणाऱ्यांची नावे वाचून दाखविणे, आवश्यकता भासल्यास निवडणूक घेणे व स्थायी समिती गठित करणे, असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सभापती निवडणुकीचा गतवेळचा प्रकार पाहता यानुषंगाने पुन्हा पार पडणाऱ्या या विशेष ऑनलाइन सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
चिखली पालिका विषय समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:36 AM