लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या १३११ सहकारी संस्थांच्या निवडणुका सहा टप्प्यांत होऊ घातल्या आहेत. कोरोना संसर्गासह अन्य तत्सम कारणांनी या निवडणुका रखडलेल्या होत्या. त्या घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, त्या अनुषंगाने पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सविस्तर माहिती मागविली आहे. बुलडाणा जिल्ह्यात २०१९पासून सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यानंतर २०२० मध्ये कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढल्यानंतर जिल्ह्यातील ११ बाजार समित्यांच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या गेल्या होत्या. दोन वेळा त्यास प्रत्येकी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने पुन्हा या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने त्यांच्याकडील सर्वंकष माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला पाठविली आहे. सहा टप्प्यांत या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. तीन-तीन महिन्यांच्या टप्प्यात कृषी, ग्रामीण सहकारी संस्था, दुग्धोत्पादन संस्था, सूतगिरणी, बाजार समित्यांसह अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.यात प्राधान्याने रखडलेल्या व २०१९-२० मध्ये व्हायच्या असलेल्या संस्थांची प्रथमत: निवडणूक होणार आहे. प्राथमिक स्तरावर ज्या संस्थांच्या मतदार याद्या तयार आहेत, त्यांना अंतिम स्वरूप देऊन निवडणुकांचा मार्ग मोकळा करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.
पहिल्या टप्प्यात ३३ संस्थांच्या निवडणुकापहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३३ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने पूर्वतयारी करण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संस्थांच्या सदस्य-संख्येच्या आधारावर या संस्थांच्या निवडणुकांचा किमान दीड लाख रुपयांपासून खर्च सुरू होतो. संस्था मोठी असल्यास राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार या निवडणुका होतील, असे सूत्रांनी सांगितले.