बुलडाणा : भारत निवडणूक आयाेगाच्या मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी, लाेकशाही विषयी जागृती निर्माण व्हावी, या हेतून राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्यात येणार आहे़ याविषयीचे शासनादेश २३ जुलै राेजी जारी करण्यात आला आहे़
विद्यापीठाने आणि प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांशी संपर्क साधून एक निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करावे. या मंडळासाठी नाेडल अधिकारी व मार्गदर्शक म्हणून एका शिक्षकाची नियुक्ती करावी. महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी हे सदस्य राहणार आहेत. तसेच प्रत्येक वर्गातील प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांमधून निवडलेली समिती या मंडळाचे कामकाज पाहणार आहे.
आभासी व्याख्यानमालांचे आयाेजन हाेणार
मतदानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या हेतूने हे मंडळ स्थापन करण्यात येणार आहे़ सध्या महाविद्यालये बंद असल्याने व्हाॅट्स ॲप, टेलिग्राम ग्रुपवर या मंडळाविषयी माहिती द्यावी़ तसेच आभासी व्याखानमालेचे आयाेजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असेही आदेशात म्हटले आहे़
१५ ऑगस्टपर्यंत मुदत
महाविद्यालयांनी येत्या १५ ऑगस्टपर्यंत आपल्या महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करावे लागणार आहे़ तसेच महाविद्यालयातील नाेडल अधिकारी आणि विद्यार्थी प्रमुख यांचे माेबाईल क्रमांक आणि ईमेल मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना ३१ ऑगस्टपर्यंत पाठवावे लागणार आहेत़ मतदान नाेंदणीसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी प्राेत्साहन द्यावे, निकाल देताना त्यांनी नाेंदणी केली आहे किंवा नाही, याची माहिती घ्यावी लागणार आहे़ तसेच लाेकशाही विषयावर विविध स्पर्धांचे आयाेजनही करावे लागणार आहे़