मुख्याधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन गुरुवारी चर्चेसाठी बोलाविल्याने आंदोलनकर्त्याने सात तासांनंतर आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मेहकर नगरपरिषदेच्यावतीने जानेफळ रस्त्यावरील गरजू लोकांसाठी घरकुल बांधून काही वाटप करण्यात आलेले आहे. मात्र या घरकुलात लाभार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह वीज पुरवठा होत नसल्याने लाभार्थ्यांना अंधारात राहावे लागत आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून घरकुल क्रमांक ९५ मध्ये राहणाऱ्या अशपाक शहा यांनी एक ते दोन महिन्यांपूर्वी नगरपालिकेत मुख्याधिकारी यांच्या नावाने रहात असलेल्या घरकुलात सुविधा देण्याची मागणी केली होती. मात्र घरकुलसंदर्भात न्यायालयात प्रकरण सुरू असल्याने व घरकुलाचे अर्धवट काम बाकी राहिल्याने नियमानुसार लाभार्थ्यांचे ताब्यात न दिल्याने घरकुलात नगरपरिषदेने कोणती सुविधा अजून दिली नाही. त्यामुळे अनेक घरकुल लाभार्थी यांनी घरकुलाची जागा परस्पर दुसऱ्यांना विकून टाकल्या, अशी ही माहिती आहे. नगरपरिषद घरकुल लाभार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज कनेक्शन पुरवीत नसल्याने या घरकुलात राहणाऱ्या अशपाक शाह यांनी बुधवारी सकाळी नऊ वाजता घरकुलाच्या परिसरात घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या १३० फूट उंची असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, पोलीस, नगर परिषद व महावितरणचे कर्मचारी उपस्थित झाले. हे आंदोलन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने शेवटी पोलिसांना राखीव पोलीस दलाची तुकडी व नगरपरिषद यांना अग्निशामक दल पाचारण करावे लागले. यावेळी शोले स्टाईलने आंदोलन करीत असलेल्या अशपाक शहा यांच्या समर्थनासाठी घरकुलातील अनेक महिला, पुरुष व बालक या ठिकाणी हजर झाले होते.
घोषणांनी दणाणला परिसर
शोले स्टाईलने सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी शेतकरी जिंदाबाद व घरकुल लाभार्थ्यांना वीज मिळालीच पाहिजे, अशा घोषणाही दिल्या. आंदोलनकर्ते अशपाक शाह हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष आहेत.