खामगाव: नांदुरा शहरासाठी जीवन वाहिनी ठरणार्या नांदुरा शहर पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी महावितरणने कापली आहे. कोट्यवधी रूपयांची वीज बिल थकल्याने महावितरणने ही कारवाई केली. या कारवाईमुळे नांदुरा शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने शहरात एकच खळबळ माजली असून वीज जोडणी कापल्याची नामुष्की नांदुरा पालिकेवर ओढवली आहे.प्राप्त माहितीनुसार, नांदुरा शहरातील नागरिकांना खामगाव तालुक्यातील गेरू माटरगाव येथील धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी नांदुरा येथील जलशुध्दीकरण केंद्र ते गेरू माटरगाव धरणापर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली आहे. जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द केलेले पाणी नगर पालिका पाणी पुरवठा योजनेद्वारे विविध वार्डातील तसेच वस्तींतील नळांना पुरविण्यात येते. दरम्यान, गत काही वर्षांत पाणी पुरवठा योजनेतंर्गत महावितरणचे कोट्यवधी रूपयांचे देयक थकले आहे. नागरिकांकडून पाणी पट्टीची वसुली थकल्याने पालिकेने वीज वितरणच्या वीज बिलाचा भरणा केला नाही म्हणून, महावितरणच्या अधिकार्यांनी कनिष्ठ अभियंता अनिल जयस्वाल यांच्या नेतृत्वात नगर पालिका पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी कापली. त्यामुळे पालिका प्रशासनासोबतच नियमित पाणी पट्टीचा भरणा करणारे नागरिकही अडचणीत सापडले आहेत.
शहराचा पाणी पुरवठा ठप्पकोट्यवधी रुपयांच्या थकीत बिलासाठी वीज जोडणी कापण्यात आली. मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाचा जोर वाढत असतानाच, शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. शहरातील नियमित कराचा भरणा आणि पाणी पट्टी धारकांनाही पाणी पुरवठा करण्यास आता पालिका असमर्थ ठरत आहे.थकीत वसुलीमुळे पालिका वेठीस -कोट्यवधी रुपयांची पाणी पट्टी नागरिकांकडे थकली आहे. अशा परिस्थितीत पाणी पुरवठा योजना चालविणे नांदुरा नगर पालिका प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असतानाच आता पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणीही कापण्यात आली आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासन संकटात सापडले आहे.थकीत वीज बिलासाठी पाणी पुरवठा योजनेची जोडणी कापण्यात आली आहे. ही वस्तुस्थिती आहे. यापुढे पाणी पट्टीचा नियमित भरणा करणार्यांनाही पाणी पुरवठा करणे अशक्य आहे. नागरिकांनी पाणी पट्टी भरून सहकार्य केल्यास परिस्थिती सुधारता येईल.नीरज नाफडे, पाणी पुरवठा अभियंता, नगर परिषद, नांदुरा...