खामगाव (बुलढाणा) : विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने शहरात सोमवारी सायंकाळी चांगलीच दाणादाण उडवली. त्याचवेळी शहरात दोन ठिकाणी वीज पडल्याने एक रोहित्र जळाले तर दुसऱ्या घटनेत बैलाचा मृत्यू झाला. या प्रकाराने शहरातील नागरिक चांगलेच धास्तावले.
दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी विजांच्या लखलखाटासह कडकडाट सुरू झाला. यावेळी शिवाजीनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असलेल्या एका रोहित्रावर वीज पडली. त्यामुळे त्यातील संपूर्ण तारा जळाल्या. परिणामी, परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.
सोबतच लगत असलेल्या पिंपळाच्या झाडावरील तीन पक्षांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच बाळापूर रोडवरील एका टायरच्या दुकानासमोर रस्ता दुभाजकावर उभ्या असलेल्या बैलावर वीज कोसळली. त्यामध्ये बैलाचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही विजांच्या कडकडाटामुळे नागरिक चांगलेच भयभीत झाले. तसेच टपोऱ्या थेंबाचा पाऊस पडला. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.