साखरखेर्डा : येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याच्या बदलीनंतरही ३३ के.व्ही.अंतर्गत विद्युतचा लपंडाव सुरुच आहे. आकाशात ढग जरी जमा झाले, तरी विद्युतपुरवठा खंडीत होत असून वीज वितरण कंपनीला विविध समस्यांचे ग्रहण लागले आहे. येथे ३३ के.व्ही.चे उपकेंद्र असून या केंद्रांतर्गत राताळी, मोहाडी, माळखेड, शिंदी, वरोडी, गुंज, सावंगीभगत, गोरेगाव, काटेपांग्री, उमनगाव, सायाळा, लिंगा, बाळसमुद्र, शेंदुर्जन, कंडारी, भंडारी, जागदरी, आंबेवाडी, दरेगाव, तांदुळवाडी या गावात आणि कृषी क्षेत्रात वीज पुरवठा केला जातो. या ३३ के.व्ही.वर मेहकर येथील ३३ के.व्ही.वाहिनीवरुन वीज प्रवाह होतो. मेहकर ते साखरखेर्डा या वाहिनीला तब्बल ७0 वर्षे झाली असून, संपूर्ण तार जीर्ण झाली आहे. त्यामुळे तारा तुटून विद्युत पुरवठा १२ ते २४ तास पर्यंत खंडीत राहतो. गत ३ ते ४ वर्षापासून विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. केवळ अधिकारी आणि कर्मचार्यांची बदली केली जाते. परंतु जो बिघाड नेहमी नेहमी होतो त्यात कायमस्वरुपी दुरुस्ती होत नाही. १४ जुलै रोजी रात्री १२ वाजता रिमझीम पावसाला सुरुवात झाली. ५ मिनीटही पाऊस पडला नाही. वीज मात्र १२ तास गुल राहिली. हा विजेचा खेळ कायमचा थांबावा आणि सक्षम अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, सेना कार्यकर्त्यांनी मागणी रेटून धरली. कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यांची बदली होऊन २0 दिवस झाले. परंतु नविन कनिष्ठ अभियंता येथे देण्यात आला नाही. येथे १0 लाईनमनची गरज असतांना एकही लाईनमन नाही. तसेच दहा विद्युत सेवकाची पदे असतांना तीनच कार्यरत आहेत. केवळ ४ ऑपरेटर अंतर्गत काम पाहिल्या जाते. आज या कार्यालयात १७ कर्मचारी आणि कनिष्ठ अभियंत्यांचे पद रिक्त आहे. ३३ उपकेंद्रात ५ पॉवरची ३ ट्रान्सफार्मर आहेत. कृषीची ग्राहक संख्या सतत वाढत असून, वीज प्रवाह वाहून नेणारी, वाहिनी तार तसेच अनेक ठिकाणचे विद्युत पोलही जीर्ण झाले आहेत. त्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होतो.याकडे संबंधीत विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
विजेचा लपंडाव सुरु
By admin | Published: July 20, 2014 11:35 PM