लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/मेहकर: मेहकर येथील जानेफळ मार्गावर कंचनीच्या महालाच्या डावीकडील बाजूला पालिकेतंर्गत उभारण्यात आलेल्या घरकुलांमध्ये राहणाऱ्यांनी आकोडे टाकून तब्बल ६७ हजार युनीट म्हणजेच ११ लाख ५० हजार रुपयांच्या विजेची चोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात चार नोव्हेंबर रोजी मध्यरात्री महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ७६ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत उईके यांनी या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २८ ऑक्टोबर रोजी त्यांनी पोलिसांसह महावितरणच्या पथकाला समवेत घेवून मेहकर-जानेफळ मार्गावरील पालिकेने उभारलेल्या घरकुलांच्या परिसरात पाहणी केली असता जवळूनच गेलेल्या अनिकट रोहीत्राच्या लगुदाब वीज वाहिनीवरून अनेकांनी येथे आकोडे टाकून वीज चोरी केली असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांच्या व पंचांच्या उपस्थितीत येथे प्रकरणी कारवाई करण्यात येवून वीज चोरीसाठी वापरण्यात आलेले वायर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. स्थानिक पातळीवर चौकशी केली असता काही ठिकाणी नागरिक राहत असले तरी त्यांना पालिकेकडून अद्याप घरकुलांचे हस्तांतरण झाले नसल्याचे कारवाई करण्यास गेलेल्या पथकाच्या निदर्शनास आले तर काहींची घरे बंद होती. त्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या यंत्रणेने तेथील साहित्य जप्त केले होते. सोबतच प्रकरणी चार नोव्हेंबरला मध्यरात्री उशिरा या प्रकरणात बुलडाणा पोलिस ठाण्यात ७६ जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या ठिकाणी जवळपास ६७ हजार युनीट वीज चोरी झाल्याने महावितरणचे ११ लाख ५० हजारांचे नुकसान झाले असून हा गुन्हा आता मेहकर पोलिसात वर्ग होत आहे.
मेहकरात ११.५० लाखांची वीज चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 11:57 AM