लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लक्ष्मी पुजनाच्या दिवशी शहरातील डीएसडी मॉलमधील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागून सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. १४ नोव्हेंबरला रात्री साडेसात वाजेच्या सुमारास अचानाक ही आग लागली. बुलडाणा पालिकेच्या अग्नीश्यामक दलाने वेळीच पोहोचून आग विझविण्याच्या केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली अन्यथा या दुकानाच्यावरच असलेल्या बँकेलाही मोठा धोका पोहोचला असता.बुलडाणा शहरातील मध्यभागी डीएसडी मॉल आहे. येथे शहरातील अनेक मोठ्या व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. या मॉलमध्येच बँका ऑफ इंडियाच्या खालील बाजूस तळमजल्यावर शिवकृपा इलेक्ट्रॉनिक हे दुकान आहे. सुभाष कुटे यांच्या मालकीचे ते आहे. १४ नोव्हेंबर रोजी पुजा करून सुभाष कुटे यांनी दुकान बंद करीत घर गाठले होते. दरम्यान त्यांच्या या दुकानाला रात्री साडेसात वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्वरित त्याची माहिती बुलडाणा शहर पोलिस व पालिकेच्या अग्नीश्यामक दलास देण्यात आली. पोलिस व पालिकेची अग्नीश्यामक दलाची गाडी लगोलग घटनास्थळी पोहोचली. पण तोवर दुकानाचे जवळपास ४० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. दुकनाचे शटर तोडून ही आग आटोक्यात आणण्यात स्थानिकांना मोठी कसरत करावी लागली. मात्र तोवर दुकानातील इलेक्ट्रॉनिक साहित्यासह अन्य साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुभाष कुटे यांचे जवळपास ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
ईलेक्ट्रॉनिक दुकानाला आग;४० लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 11:04 AM