संदीप वानखडे, बुलढाणा, सिंदखेडराजा : मराठा समाजाकडून ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणी विरोधात हजारो ओबीसी बांधव सोमवारी शहरात एकत्र आले. ओबीसींच्या आरक्षण बचाव महामोर्चाने केलेले हे आंदोलन लक्षवेधी ठरले.
राज्यातील मराठा समाजाला सर सगट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याची मागणी होत आहे. या मागणीला ओबीसी बांधवांचा विरोध असल्याने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पहावयास मिळत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेट दिला असून, त्यातील आठ दिवस शिल्लक असतानाच मातृतीर्थातून ओबीसी बांधवांनी या विरोधात एल्गार पुकारला आहे. राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातून अन्य कोणत्याच समाजाला आरक्षण देऊ नये, अशी जोरदार मागणी ओबीसी आरक्षण बचाव महामोर्चातून करण्यात आली.
विदर्भ, मराठवाड्यातून हजारोंचा सहभाग
मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, संभाजीनगर आदी जिल्ह्यांतून शेकडो ओबीसी समाजबांधव या मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते. मराठवाड्यात सध्या मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू आहे. त्यांच्या परवा झालेल्या सभेत छगन भुजबळ यांच्यावर एकेरी भाषेत झालेल्या टीकेचा आजच्या ओबीसी मोर्चात चांगलाच समाचार घेण्यात आला. दरम्यान, जालना येथून १०० मोटारसायकलवरून २०० ओबीसी कार्यकर्ते मोर्चासाठी आले होते.
मोर्चात महिलांचा मोठा सहभाग
राजवाडा येथून सुरू झालेल्या मोर्चात विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांचा मोठा सहभाग पहावयास मिळाला. देऊळगाव राजा येथील पूनम खंदारे या विद्यार्थिनीने ओबीसी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सांगून सर्वांचेच लक्ष वेधले.