मलकापूर पांगरा : येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी एल्गार पुकारून ५ जून रोजी थेट ग्रामपंचायत कार्यालयात घागर मोर्चा नेला. यावेळी सरपंच पतीला घेराव घालत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. विहिरीवरून पाण्याच्याटाकीपर्यंत येणाऱ्या व्हॉल्ववर असलेले अवैध नळ कनेक्शन तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी महिलांनी केली.
पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर अवैध नळ सुरू राहतात. गावातील पाईपलाईन दुरुस्त नसून ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित कारभारामुळे खाली पाणी मिळत नसल्याने अवैध असलेले नळ कनेक्शन कट करण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी महिलांनी हा मोर्चा काढला. मलकापूर पांगरा येथे नळ योजनेसाठी दोन कोटी ९० लाख रुपये मिळाले आहेत. परंतू पिण्याच्या पाण्यासाठी मलकापूर पांगरा वासीयांना भटकंती करावी लागत आहे. मलकापूर पांगरा नळ योजनेसाठी हनवतखेड येथे स्वतंत्र विहीर आहे. त्यानंतर केशव शिवनी येथे दुसरी विहीर आहे.
मुबलक पाणी असताना देखील १५ दिवसाआड पाणीपुरवठा केल्या जातो. त्याच ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे एखाद्या वार्डात अवैध नळ कनेक्शनवर रात्रंदिवस पाणी सुरू राहते. तर काही भागात नळाला थेंबभर पाणी येत नाही. वार्ड क्रमांक एक व चारमधील महिलांना पाणी मिळत नसल्याकारणाने ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये गावातील अनेक महिलांचा सहभाग होता.
नळ योजना सुरू झाल्यापासून लोकांनी अवैध कनेक्शन घेऊन ठेवलेले आहेत. ते आमच्या निदर्शनास आले असून नोटीस बजावून ते तातडीने कट करण्यात येतील. चार दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.-अनिता बंडू उगले, सरपंच, मलकापूर पांगरा.
मुख्य पाईपलाईनवरील अवैध कनेक्शन कट करण्यात येईल. तसे अवैध कनेक्शनधारकांना आम्ही नोटिसा बजावणार आहोत. एका ठिकाणी वाॅल्व टाकावा लागतो, ते येत्या चार दिवसात वाॅल्व टाकून पाणी प्रश्न सुरळीत करण्यात येईल.-वसंतराव चेके, ग्रामविकास अधिकारी, मलकापूर पांगरा.