लोणार तालुक्यातील वेणी येथे मागील काही वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने मागासवर्गीय महिलांचा बचत गट कार्यान्वित आहे. महिला बचत गटास आर्थिक विकास महामंडळ बुलडाणा अंतर्गत असलेल्या संजीवनी लोकसंचालित साधन केंद्र लोणार या केंद्र कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा अंतर्गत जिल्हा मानव विकास मिशन बुलडाणामार्फत सन २०२०-२१ या वर्षांमध्ये कृषी अवजारे बँक योजनेसाठी प्रस्तावित करून मंजूर करण्यात आली होती. परंतु लोक साधन केंद्र लोणारच्या व्यवस्थापक व सहयोगिनी यांच्यासह जिल्हा समन्वय अधिकारी यांच्या संगनमताने वेणी येथील महिला बचत गटास पैशाची मागणी करण्यात आली होती. मात्र मागासवर्गीय महिलांचा बचत गट असल्याने या महिलांनी जास्तीचे पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळेच आमच्या गटास मंजूर झालेली योजना दुसऱ्या गटास दिली व याबाबतचा कुठलाही ठराव किंवा विचारणा आमच्या महिला बचत गटाला केली गेली नसल्याचा आरोप तक्रारकर्त्या महिला बचत गटाच्या सदस्यांनी केला आहे. दरम्यान, सदर योजनेबाबत संबंधित केंद्राचे व्यवस्थापक व सहयोगिनी यांनी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार अथवा तोंडी किंवा लेखी सूचना, माहिती दिली नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. निवेदनावर महिला बचत गटाच्या सदस्या विमल इंगळे, इंदू वाघमारे, वंदना वाघमारे, जरिता वाघमारे, रंभा जाधव आदींची स्वाक्षरी आहे.
सुलतानपूर परिसरातील पात्र लाभार्थी वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:26 AM