Elon Musk: इलॉन मस्क (Elon Musk) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता नवीन X युजर्सना पोस्ट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. या नवीन निर्णयामुळे सर्वच X युजर्सना धक्का बसला आहे. एका X युजरला रिप्लाय देताना मस्क म्हणाले की, आता पोस्ट करण्यासाठी नवीन युजर्सकडून एक लहान फी आकारली जाईल. सातत्याने होणारे बॉट्सचे हल्ले थांबवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
इलॉन मस्कने गेल्या वर्षी ट्विटर विकत घेतले. ट्विटर विकत घेतल्यापासून यात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला ट्विटरचे नाव बदलून X केले त्यानंतर त्याचा लोगोही बदलण्यात आला. पुढे ब्लू टिकसाठी पैसे आकारने सुरू झाले. दरम्यान, या नवीन अपडेटबाबत मस्क म्हणाले की, "नवीन युजर्स तीन महिन्यांनंतर विनामूल्य पोस्ट करू शकतात." विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात X ने न्यूझीलंड आणि फिलीपिन्समधील नवीन युजर्सकडून दर वर्षी एक डॉलर शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती. तसेच, या महिन्याच्या सुरुवातीला एक्सने मोठ्या प्रमाणावर स्पॅम खाती काढून टाकण्याची घोषणा केली.
मस्क यांचा विश्वास आहे की, फी लागू केल्यामुळे बॉट्स आणि फेक अकाउंटवरील पोस्ट कमी होतील. सध्या कोणीही नवीन खाते तयार करुन काहीही पोस्ट करत आहे. मस्क यांच्यानुसार, बॉट्स थांबवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. X च्या नवीन धोरणानुसार X वर पोस्ट करणे, एखाद्याच्या पोस्ट लाइक करणे, पोस्ट बुकमार्क करणे आणि पोस्टला उत्तर देणे, यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील.