सिंदखेडराजा तालुक्यात एकूण ७१ हजार हेक्टर शेतजमीन क्षेत्र आहे. यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. खरिपात कपाशी, सोयाबीन या पिकांवर शेतकऱ्यांचा अधिक भर असतो. मात्र, यंदा कपाशीचे क्षेत्र कमी होऊन तूर लागवड क्षेत्र वाढविले पाहिजे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून शेतकऱ्यांनी नगदी पीक लागवडीकडे वळावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी केले आहे.
मागील हंगामात कपाशी क्षेत्र २२ हजार हेक्टर होते. त्यात यंदा घट होणार असून १९ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड होईल. सोयाबीन लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक म्हणजे ३४ हजार हेक्टर आहे. यंदाही तेवढ्याच क्षेत्रावर सोयाबीन लागवड होणार आहे. तूर लागवड सहा हजार हेक्टर क्षेत्रावर होईल. त्यात अधिक वाढ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे राठोड यांनी सांगितले. मूग, उडीद प्रत्येकी तीन हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असून जवळपास पाचशे हेक्टरवर मका लागवडीचे उद्दिष्ट आहे. इतर पिकांनादेखील शेतकरी प्राधान्य देतात. परंतु कडधान्य विकास कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपले उत्पन्न वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बांबू लागवडीवर भर देणार
राष्ट्रीय बांबू मिशन व अटल बांबू योजनेंतर्गत तालुक्यात बांबू लागवडीवर भर दिला जाणार आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत शनिवारी बांबू लागवड वाढावी, यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनीदेखील बांबू लागवडीकडे वळावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी केले आहे.