गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमांतर्गत जयंत पाटील हे विदर्भातील जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने दौरा करीत असून एकंदरीत स्थिती जाणून घेत आहेत. दरम्यान, विधानसभा मतदारसंघनिहाय ते प्रामुख्याने आढावा घेत आहेत. त्यानुषंगाने बुलडाण्यातील जलसंपदा विभागाची बैठक झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी परिवाराशी संवाद साधला. या वेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री डॉ. राजेद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील अन्य पदाधिकारी होते.
दरम्यान, या संवाद कार्यक्रमात प्रामुख्याने संघटनात्मक आढाव्यावर भर देण्यात आला. तसेच जिल्हाध्यक्ष बदलासंदर्भात संघटनात्मक पातळीवर सुरू असलेला मुद्दाही तूर्तास बाजूला ठेवण्यात आल्याचे एकंदरीत चित्र होते. दरम्यान त्याउपरही काहींनी अनुषंगिक मागणी प्रदेशाध्यक्षांकडे रेटल्याने जुन्या व नव्या नेत्यांत शाब्दिक खडाजंगी झाली. परिणामी अंतर्गत पातळीवरील वाद बैठकस्थळी चव्हाट्यावर आला होता.
जिल्हा कार्यालय अर्थात राष्ट्रवादी भवनात या दरम्यान बुलडाणा, चिखली व मलकापूर मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली, याशिवाय जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली, यात जाहीरपणे काही खळखळ व्यक्त झाली नसली तरी जिल्हाध्यक्ष बदलासंदर्भात अनेक जण दबक्या आवाजात चर्चा करत आहेत.