लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : शहरात लसीकरण मोहीम राबविली जात असून यात सर्वांनी सहभागी होण्यासह कोविड नियम पाळण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांनी व्यापारी बांधवांना केले.
शहरातील व्यापाऱ्यांची पालिका सभागृहात बैठक झाली. यात तहसीलदार सुनील सावंत, नगराध्यक्ष सतीश तायडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता बिराजदार, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, डॉ. दत्तात्रय बुरकुल यांची उपस्थिती होती. वेगवेगळ्या क्षेत्रांत व्यापार करणाऱ्या व्यापारी बांधवांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देताना डॉ. बिराजदार यांनी जे लोक एका वेळी अनेकांच्या संपर्कात असतात आणि ज्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होऊ शकतो अशा व्यक्तींना सुपर स्प्रेडर म्हटले जात असून यात सर्व प्रकारचे व्यापारी येतात. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कोविड नियम पाळल्यास आपण या रोगापासून वाचू शकतो. कोरोना संसर्ग कोणालाही होऊ नये यासाठी पालिका, आरोग्य विभाग आणि तालुका प्रशासन प्रयत्न करीत आहे, परंतु ही नागरिक, व्यापाऱ्यांची जबाबदारी असल्याने प्रत्येकाने नियम पळण्यासह लसीकरण करून घेतले पाहिजे, असे आवाहन नगराध्यक्ष सतीश तायडे यांनी केले. आपण सुरक्षित असला तर आपला परिवार सुरक्षित राहील. त्यामुळे लसीकरण सर्वांनी करावे. आपल्या दुकानात आलेल्या ग्राहकांनाही यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन तहसीलदार सुनील सावंत यांनी केले तर पालिका मुख्याधिकारी यांनी या संदर्भातील नियमांची आठवण करून देताना सर्वांनी काळजी घेऊन प्रत्येक व्यापाऱ्याने दहा जणांना नियम पाळणे आणि लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.