बुलडाणा : केंद्र सरकारच्या विभिन्न योजनांमध्ये काम करणारे लाखो कर्मचारी १७ जानेवारीला एक दिवसीय संपात सहभागी होणार आहेत. या संपामध्ये जिल्ह्यातील सिटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटना, आशा वर्कर्स आणि गट प्रवर्तक संघटना आणि शालेय पोषण आहार कामगारांसमवेत सर्व संघटनांचे सभासद सहभागी होणार आहेत. केंद्र तथा राज्य सरकारच्या अखत्यारित संपूर्ण देशात लाखो कामगार काम करीत असतात. परंतु त्यांना किमान वेतन, सेवाशर्ती, सामाजीक सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे या कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. कामगारविरोधी कायदे वाढतच असून, त्यातून मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण आणि खाजगीकरण होत आहे. लाखोंच्या संख्येने कामगार बेरोजगार होत आहेत. त्यामुळे या सरकारच्या सर्व धोरणांचा विरोध करण्यासाठी देशभरातील ११ योजना कर्मचºयांच्या संघटनांनी १७ जानेवारीला एकदिवसीय संपाची हाक दिलेली आहे. या दिवशी अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर्स, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी यासह सर्वच प्रकारच्या योजना कर्मचाºयांनी या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन सीटूचे जिला सेक्रेटरी पंजाबराव गायकवाड यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या कर्मचाऱ्यांचा १७ जानेवारीला संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 2:09 PM