अमडापूर (जि. बुलडाणा): महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अमडापूर फिडर अंतर्गत उंद्री परिसरातील २४ गावांमध्ये रात्री- अपरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने याचा त्रास नागरिक, विद्यार्थ्यांंना सहन करावा लागत असल्याने ४ जुलै रोजी युवक काँग्रेसचे महासचिव राम डहाके यांच्यासह पदाधिकार्यांनी सहायक अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घातला. निवेदनामध्ये म्हटले आहे, की अमडापूर फिडरमधील उंद्री परिसरातील उंद्रीसह २४ गावांमध्ये रात्री-अपरात्री अचानक वीज पुरवठा खंडित होऊन परिसरातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार खंडित होणार्या वीज पुरवठय़ामुळे खेड्यागावात रात्रभर अंधारात राहावे लागते. यातच आता सणासुदीचे दिवस, शाळा कॉलेज सुरू झालेले आहे. त्यामुळे या खंडित होणार्या वीज पुरवठय़ामुळे विद्यार्थ्यांंना त्रास सहन करावा लागतो. सध्या पावसाळ्याचे डासांपासून उद्भवणारे आजार, मलेरिया, डेंग्यू, मेंदुज्वर यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. रात्रीच्या अंधारामुळे सर्पदंशाची शक्यता नाकारता येत नाही. जास्तीचे आकारलेल्या बिलामुळे सुद्धा नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येबाबत महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष घालून खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा युवक काँग्रेसच्यावतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन आ.राहुल बोंद्रे, अधीक्षक अभियंता बुलडाणा यांना समाधान सुपेकर, मनोज लाहुडकर, भगवान वरणकार, ज्ञानेश्वर हिवरकर, शेख गुलाबभाई, नारायण उफाळ, बाबूराव सोनुने यांनी देऊन सहायक अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार व निवेदन दिले आहे.
अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार!
By admin | Published: July 05, 2016 1:01 AM