खामगाव : संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या खामगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाला अतिक्रमणाचा विळखा असल्याचे दिसून येते. गणेश विसर्जनाला अवघे चार दिवस उरले असतानाही, अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकाºयांचे स्पष्ट निर्देश असतानाही नगर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्यासाठी चालढकल पणा केला जातो. त्यामुळे शहरातील गल्ली-बोळीला अतिक्रमणाचा विळखा आहे. प्रमुख मार्गासह काही अंतर्गत मार्गावर नागरिकांनी व्यावसायिक प्रतिष्ठानांसोबतच घरेही बांधली आहेत. दरम्यान, आधीच अरुंद असलेल्या गणेश विसर्जन मार्गावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. या मार्गावरील काही दुकानदारांनी आपली दुकाने थेट रोडपर्यंत वाढविली आहेत. त्यामुळे हा मार्ग अरुंद झाला आहे. आधीच निमुळत्या असलेल्या या मार्गावर अतिक्रमणामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत विसर्जन मिरवणुकीतील वाहने कशी न्यावीत, हा प्रश्न गणेश मंडळांना पडला आहे. दरम्यान, या मार्गावरील अतिक्रमण निर्मुलनासाठी पालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाय योजना केल्या जात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
अतिक्रमण निमूर्लनाचा तांत्रिक पेच!
अतिक्रमण निमूर्लनावरून नेहमीच वाद उद्भवतो. सोबतच राजकीय दबावही वाढतो. त्यामुळे शहरातील अतिक्रमण काढावे, तरी कसे? असा प्रश्न नगर पालिका अतिक्रमण निमूर्लन पथकापुढे नेहमीच उभा असतो. काही दिवसांपासून मुख्याधिकारी बाहेरगावी आहेत. त्यामुळे अतिक्रमण निमूर्लनाचा आदेश मिळाला तरी, कमी वेळात अतिक्रमण काढण्याचा ‘पेच’ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिक्रमण निमूर्लनासोबतच शहरातील स्वच्छतेकडेही दुर्लक्ष केल्या जात असल्याचे दिसून येते.