किनगाव जट्टू : येथून जवळच असलेल्या खापरखेड लाड येथील पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने, ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले हाेते. या वृत्ताची दखल घेत, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकरराव घुगे व शाखा अभियंता गिरी, ग्रामविकास अधिकारी अविनाश नवले यांनी ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची व स्रोताची पाहणी केली. त्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार आहे.
पाणीपुरवठा याेजना बंद असल्याने, गत काही दिवसांपासून खापरखेड लाड येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची भर उन्हात पाण्यासाठी भटकंती हाेत आहे. याविषयी ‘लाेकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले हाेेते. या वृत्ताची दखल घेत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर घुगे व शाखा अभियंता गिरी यांनी किनगाव जट्टूला भेट देऊन पाणीपुरवठा योजना व पाण्याचे स्रोताची पाहणी केली, तसेच भूजल सर्वेक्षण यंत्रणेचा अभिप्राय घेऊन जल जीवन मिशन अंतर्गत किनगाव जट्टू, वसंतनगर, सह खापरखेड लाड येथील नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे अभियंता घुगे यांनी ग्रामपंचायतला सूचना दिल्या. यामध्ये किनगाव जट्टू येथील चालू असलेल्या पाणीपुरवठ्याच्या दोन्ही विहिरी सह चोरपांग्रा धरणाजवळील विहिरीचे खोलीकरण व मुख्य पाइपलाइन पाण्याची उंच टाकी, तसेच गावातील पूर्ण वितरण व्यवस्था याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. खापरखेड लाड वसनगर येथीलही प्रस्ताव सादर करण्यात येऊन तात्पुरती व्यवस्था म्हणून आवश्यक ठिकाणी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याचे सांगितले. त्यामुळे खापरखेड लाडचा पाणीप्रश्न लवकरच मिटणार असल्याचे चित्र आहे.