मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील दाभाडी परिसरात सिंगल फेज गावठाणचा वीज पुरवठा रात्रीच्यावेळी वारंवार खंडित होत आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे होणार्या या अघोषित भारनियमनाला ग्रामस्थांसह शेतकरी कमालीचे त्रासले आहेत. वीज वितरणाच्या अधिकार्यांना वेळोवेळी सूचना करूनही याकडे संबंधितांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २७ जून रोजी कार्यकारी उ पविभागीय वीज अभियंता वर्हाडे यांना घेराव टाकून जाब विचारला. दरम्यान, वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास संयम सुटू शकतो, असा इशारा संतप्त ग्रामस्थ व शेतकर्यांनी यावेळी दिला. दाभाडी, शेलापूर, घुस्सर, शेलगाव बाजार येथील वीज पुरवठा गेल्या सहा दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे. बंद वीज पुरवठय़ाबाबत चौकशी करण्यासाठी नागरिक फोन लावतात तेव्हा फोन नेहमी सारखा बिझी मोडवर असतो. फोन लागलाच तर उद्धटपणे उडवाउडवीची उत्तरे ग्रामस्थांना ऐकायला मिळतात. यावेळी आक्रमक शेतकर्यांनी शेलापूर मंडळ परिसरातील जिवंत विजेच्या तारांवर लटकलेल्या झाडांच्या फांद्या तोडून दुरुस्तीची कामे त्वरित करण्यात यावी, अशी मागणी संतप्त शेतकर्यांनी यावेळी केली. दरम्यान, वीज अभियंता वर्हाडे यांनी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन विजेच्या समस्यांची सोडवणूक करण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली. यावेळी दाभाडीचे सरपंच अरविंद पाटील, तुळशीराम नाईक, जिल्हा युवक काँग्रेस महासचिव नीलेश जाधव, हेमंत चोपडे, कुंडल पाटील, उमेश वानखेडे, बाळू खर्चे, बंडू हिंगे, श्यामराव तायडेंसह मोठय़ा प्रमाणात शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
संतप्त शेतक-यांचा वीज अभियंत्यास घेराव!
By admin | Published: June 28, 2016 1:43 AM