वरवट बकाल (बुलढाणा) : मराठा आरक्षणासाठी संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे या गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे, तसेच गावातील विद्यार्थ्यांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. अनेक गावांत मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे या गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिला जाणार नाही. गावात राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी आल्यास त्यांना विरोध करण्यात येणार आहे.
धामणगावात मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी असल्याचे फलक गावात प्रवेश करताना प्रथम दर्शनी लावण्यात आले आहे. मराठा समाजाचे विद्यार्थी यांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नसल्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. मराठा समाज बांधवांनी आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा देण्यात आला आहे.