सिंदखेडराजा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. रविवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीनंतर सोमवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. राज्यातील सत्तेचे समीकरण येथील बाजार समितीत आणण्यात आले आहे.या बैठकीत महायुती विरोधात बाजार समिती निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे बाजार समितीची निवडणूक अटळ असून यासाठी महाविकास आघाडीनेही आता कंबर कसली आहे. स्थानिक विश्राम गृह येथे रविवारी महा युतीची बैठक झाली. राष्ट्रवादी,भाजपा व शिंदे गट शिवसेना यासाठी एकत्रित येवून ही निवडणूक लढविण्यावर या बैठकीत एकमत झाले आहे. दरम्यान, या बैठकीत उद्धव ठाकरे गट शिवसेना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवण्यात आल्याने या दोन्ही पक्षांमध्ये नाराजी दिसून आली. सर्वांना सोबत घेवून बाजार समितीची निवडणूक अविरोध करणे शक्य होते. मात्र आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही, या मुळे आता निवडणुकीला सामोरे जावू आणि विरोधकांना संपूर्ण ताकदीने पराभूत करण्याची मानसिकता महा विकास आघाडीने केली असल्याचे चित्र आहे.
आता निवडणूक होणार : छगनराव मेहेत्रे
आपल्याला ही निवडणूक अविरोध करायची आहे. आम्ही आपल्याला जागा देवू शकत नाही. ही साधी विचारणा आमच्याकडे करणे अपेक्षित होते. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत आम्हाला कुठेही विचारणा झाली नाही, याचा अर्थ आम्ही आता निवडणुकीला मोकळे आहोत. या मतदार संघाचे भाग्य विधाते म्हणून म्हणून ओळख असलेल्यांनी एकवेळ विचारणा करणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने आता काँग्रेस सोबत जावून निवडणूक आम्ही लढविणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगनराव मेहेत्रे यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुकीला सामोरे जाणार : मनोज कायंदे
बाजार समिती निवडणूक संदर्भात आमची ठाकरे गटासोबत बैठक झाली. आम्ही यात मनसेला सोबत घेवून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नुसार आम्ही पुढील नियोजन करीत असल्याचे काँग्रेसचे नेते मनोज कायंदे यांनी सांगितले. आम्हाला मनसेसह वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.