बुलढाणा : समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथील अपघातानंतर या ठिकाणी महामृत्यूंजय यंत्राची स्थापना करून महामृत्यूंजय मंत्राचा जप करत अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याप्रकरणी तथा चमत्कार करण्याच्या क्षमतेचा दावा केल्याप्रकरणी सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणाली अटक करण्यात आलेली नाही. मात्र या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोना प्रतिबंध घालणे तसेच समुळ उच्चाटण करण्याच्या २०१३ च्या अधिनियमाचा आधार घेत अनुषंगीक प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन त्यात २५ लोकांचा जळून मृत्यू झाला होता. त्यासंदर्भाने महामृत्यूंजय यंत्राची स्थापना समृद्धी महामार्गावर पिंपळुखाट शिवारात (ता. सिंदखेड राजा) २३ ते २४ जुलै दरम्यान करण्यात आली होती. सोबतच महामृत्यूंजय यंत्राचा जपही करण्यात आला होता. दरम्यान या यंत्रामुळे ५ किमीच्या अंतरामध्ये अपघात होणार नाही आणि अपघात झाल्यास कोणाला मृत्यू येणार नाही, असा प्रकारे चमत्कार करण्याच्या दावा यासंदर्भाने करण्यात आला होता.
प्रसारमाध्यमामध्येही त्यानुषंगाने वृत्त प्रसारीत झाले होते. त्यामुळे जनसामान्यांची दिशाभूल झाल्याप्रकरणी तसेच आरोपीकडे अलौकिक शक्ती आहे व लोक त्याच्या आज्ञा पाळण्यास भाग पडतील अशी भावना निर्माण केल्याप्रकरणी २०१३ च्या अंधश्रद्धा निर्मूलन काद्यान्वये नीलेश रामदास आढाव (रा. सिंदखेड राजा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २४ जुलै रोजी रात्री दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज राठोड हे करीत आहेत. दरम्यान देऊळगाव राजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मालवीय यांनीही घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे.