लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अॅन्टीजन चाचणीत बाधित आढळून आल्यानंतर अनेक जण त्यावर विश्वास न ठेवता पुन्हा टेस्ट करीत असल्याचे प्रकार वाढल्याची माहिती आहे. ही शंका स्वत:साठी व दुसऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.गेल्या आठवडाभरात पुन्हा पुन्हा टेस्ट करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आम्हाला कोरोना नाही, हा गैरसमज अत्यंत धोकादायक ठरू शकतो. यंत्रणेवर लोक का विश्वास ठेवत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चाचण्यांच्या गैरसमजातून अनेक लोक यंत्रणेशी वाद घालत असल्याचे प्रकारही घडत असून, लोकांनी यंत्रणेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.एखादी व्यक्ती कोणत्याही कोरोना चाचणीत बाधित आढळल्यास त्या व्यक्तीला दुसरी चाचणी करण्याची आवश्यकता नसते. अशा व्यक्तींनी तातडीने विलग होऊन उपचार सुरू करावे, अन्यथा स्वत:साठी आणि कुटुंबासाठी हे धोकादायक ठरू शकते. काही कारणास्तव तासाभरानंतरची चाचणी निगेटिव्ह येऊ शकते; मात्र आधीची चाचणी बाधित असल्याने अशा व्यक्ती बाधितच असतात.
तज्ज्ञ काय सांगतात? एखाद्या व्यक्तीची अॅन्टीजन चाचणी केल्यानंतर ती निगेटिव्ह आली आणि संबंधित व्यक्तीला लक्षणे असतील तर त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. एखाद्या व्यक्तीची अॅन्टीजन चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होते. दुसरी चाचणी करण्याची गरज नसते. अॅन्टीजन ही स्क्रीनिंग टेस्ट ३ असून, याची पॉझिटिव्हिटी ही शंभर टक्के असते.
एखाद्या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीने या अहवालावर विश्वास ठेवावा. तत्काळ उपचार घेण्यास सुरुवात करावी. उपचारास विलंब झाल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णांनी सेकंड ओपीनियन घेण्याचे टाळावे.- डॉ. प्रेमचंद पंडित, वैद्यकीय अधीक्षक, शेगाव.