- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : गतवर्षी गुलाबी बोंड अळी व संततधार पावसाने झालेल्या बोंडसडमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कृषी विभागानेही यावर्षी कपाशीची पेरणी होईल, असा अंदाज बांधला होता. मात्र, शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीलाच पसंती दिली असून, खामगाव तालुक्यात २७ हजार ५५६ हेक्टरवर लागवड केली आहे. गतवर्षी बुलडाणा जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे कपाशीचे २० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. त्यानंतर परतीचा पाऊस जोरदार व संततधार झाला. त्यामुळे कपाशीची बोंडे सडली. आधीच बोंडअळीने नुकसान झाल्यानंतर बोंडसडमुळे कपाशीचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले होते. त्या तुलनेत सोयाबीन व अन्य पिकांचे उत्पादन चांगले झाले होते. त्यामुळे यावर्षी कपाशीची पेरणी कमी प्रमाणात होईल, असे नियोजन कृषी विभागाने केले होते. तालुक्यात बागायती कापूस ७ हजार तर जिरायती कापूस १८ हजार अशी कपाशीची २५ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत केवळ ६० टक्केच पेरणी झाली असून, तालुक्यात २७ हजार ५५६ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कपाशीचे एका एकरात पेरणी करण्याकरिता १ हजार रुपयांचे बियाणे लागते तर सोयाबीनचे ३५०० रुपयांचे बियाणे लागते. त्यातच गतवर्षी तालुक्यात सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात बोगस निघाले होते. त्यामुळेही शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीच्या लागवडीला पसंती दिली.
तालुक्यात ६० टक्के पेरणी n तालुक्यात एकूण भौगोलिक क्षेत्र ११८५३४ हेक्टर असून पेरणीयोग्य वहितीखालील क्षेत्र ८४३७१ हेक्टर आहे. n यापैकी ४९९५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक कपाशीची पेरणी झाली आहे.