राज्यातील कर्मचाऱ्यांची देणी २०१८ पासून थकीत होती. मात्र, कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काही देणी देण्यात आली असून, जानेवारी २०१९ पासूनची देणी बाकी आहेत. संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहेत. एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात. मात्र, जानेवारी २०१९ पासून राज्यभरातील निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही रक्कम अद्यापही महामंडळाकडून मिळालेली नाही.
सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सेवा पूर्ण केली. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेंशन नसून ईपीएस ९५अंतर्गत मोजकेच मानधन दिले जाते. सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तिनंतरची देयके त्वरित देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांनी केलेल्या सेवेच्या मोबदल्याकरिता ताटकळत ठेवणे ही बाब अत्यंत निंदनीय असून एसटी प्रशासनाने तत्काळ सेवानिवृत्तिधारकाची अंतिम देयके द्यावी.
-प्रदीप गायकी, महाराष्ट्र प्रदेश सचिव,
महाराष्ट नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना
एसटी कर्मचारी अतिशय कमी वेतनात काम करतात. त्यांचे कामही आरामदायक नसून सतत धावपळ असणारे आहे. अशा परिस्थितीतही सर्व अडचणींचा सामना करत कर्मचारी आपली सेवा पूर्ण करतात. सेवा पूर्ण झाल्यानंतर अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची असलेली देयके २०१९ पासून देण्यात आलेली नाहीत. कर्मचाऱ्यांच्या कष्टाची रक्कम रोखणे योग्य नाही. कर्मचाऱ्यांना थकीत देयके तत्काळ देण्यात यावी.
-प्रकाश बस्सी, जिल्हाध्यक्ष, म.न.रा.प.का. सेना, बुलडाणा
इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना निवृत्तीनंतरची रक्कमसुद्धा कमी मिळते. त्यातही ही रक्कम थकीत राहिल्याने निवृत्त कर्मचारी व अधिकारी संकटात सापडले आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्यांना औषधोपचारासाठीसुद्धा रक्कम कामी आलेली नाही.
-भिकाजी दाभाडे, सेवानिवृत्त वाहक, एसटी महामंडळ
पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. मात्र, अद्यापपर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत, ही रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नसल्याचे कारण समोर करण्यात येते. मात्र थकीत देयके न मिळाल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
-भगवान डंबेलकर, सेवानिवृत्त चालक, एसटी महामंडळ
एकूण आगार : ७
एकूण बसस्थानक : ८
एकूण वाहतूक नियंत्रण केंद्र : ५