लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने सार्वजनिक कार्यक्रम, मंगल कार्यालये, सभागृह बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत, तर नियोजित विवाह सोहळ्यांना केवळ ५० लोकांना परवानगी देण्याचे आदेश आहेत. मात्र, विवाह समारंभातील वहाडींची गर्दी ३०० ते ४०० पेक्षा कमी झालेली नाही. काहींनी टप्प्याटप्प्याने पाहुण्यांना वेळेनुसार बोलावून समारंभ साजरा करण्याची नवीन शक्कल लढविली आहे. समारंभ वरकरणी परवानगीनुसारच पार पडत असले, तरी कधीही गेले तरी पाहुणे ५० एवढेच दिसतील, अशी रीतसर व्यवस्था केली जात आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढल्याने १ ते ८ मार्चपर्यंत लॉकडाऊनचे आदेश आहेत. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे. ‘नो मास्क-नोएन्ट्री’ असे फलक शासकीय ते खासगी आस्थापनेमध्ये झळकू लागले आहेत. वाहन चालकापासून तर सर्वसामान्य रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना मास्क आवश्यक आहे. विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून, केवळ विवाहाला लॉकडाऊन नसलेल्या ठिकाणी ५० लोकांना परवानगी देण्यात येत आहे. मात्र, यातूनही विवाह सोहळे करणाऱ्यांनी शक्कल लढविली आहे. आलेल्या पाहुण्यांना नजीकच्या परिसरात ठेवून राहत्या घरातच समारंभ परवानगीनुसारच पार पडत असल्याचा आभास करीत आहेत. आलेल्या पाहुण्यांपैकी केवळ पंगत बसली की आणायचे, पुन्हा त्यांचे जेवण आटोपले की, नवे ५० जणांना बोलाविण्यात येत आहे. पालिकेचे तपासणी पथक गेल्यास त्यांना सर्व काही आलबेल दिसेल, अशी ही शक्कल लढविली जात आहे.
विवाह आधी जुळलेल्यांची अडचण लॉकडाऊन काळात होणारे विवाह किमान दोन-तीन महिन्यांपूर्वी जुळलेले आहेत. त्यानुसार, नातेवाईक, मित्रमंडळींना पत्रिका पाठविण्यात आल्या. मंगल कार्यालयाला २०० ते ३०० वऱ्हाडींच्या भोजनाची व अन्य सुविधांसाठी अॅडव्हान्स रक्कम देण्यात आली. आता अगदी वेळेवर गत आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तो ८ मार्चपर्यंत वाढविण्यातही आला. त्यामुळे आता कुणाला बोलवायचे, कुणाला टाळायचे, असा पेच निर्माण झाला. त्यामुळे एक-एक तासाने आमंत्रितांना बोलावण्याची नवी शक्कल लढविली जात आहे. सोशल मीडिया सुसाट मंगल कार्यालयात आधी ५० वऱ्हाडीना परवानगी देण्यात आली होती. त्यापेक्षा जास्त वऱ्हाडी आढळल्यास २५ हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई केली जाते.