मेहकर : खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवलेला जनता एज्युकेशन सोसायटी अंजनी खुर्दचा अल्पसंख्याक दर्जा शासनाने १५ जानेवारी राेजी रद्द केला आहे.
जनता एज्युकेशन सोसायटी अंजनी खुर्दच्या संचालकांनी बनावट कागदपत्रे सादर करून अल्पसंख्याक दर्जा मिळवल्याची तक्रार संस्थेच्या मयत सदस्याच्या पत्नीने जिल्हाधिकाऱ्यांकडे १६ डिसेंबर २०१९ रोजी लेखी स्वरूपात केली होती. त्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी २८ फेब्रुवारी रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना चौकशी करण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार उपशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी १७ मार्च रोजी जनता विद्यालयाला भेट देऊन कागदपत्रांची पडताळणी केली. मात्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला हाेता. त्यामुळे यातील दोषींवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी लेखी तक्रार केशरबाई गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे २२ जून रोजी केली होती; परंतु बनावट कागदपत्रांचा आधार घेत संबंधित संस्थाचालकांनी हे प्रकरण अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे दाखल केल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी सक्षम प्राधिकारी तथा सहसचिव अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे झाली. या प्रकरणांमध्ये चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर करून अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळाले असल्याचे उघड झाल्यामुळे १५ जानेवारी २०२१ च्या आदेशानुसार जनता विद्यालय अंजनी खुर्द या शाळेचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिले.
कोट..
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व प्राचार्य यांनी संगनमत करून खोटे निर्गम उतारे व शाळा सोडल्याचे बनावट दाखले तयार केल्याचे सक्षम प्राधिकारी तथा सहायक सचिव अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय यांच्या निदर्शनास आले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी बुलडाणा यांनी दोषी व्यक्तींवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करीत शासनाने गुन्हा दाखल करावा.
- केशरबाई गायकवाड,
अंजनी खुर्द