लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पशू विज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुसंवर्धन व त्याच्या संबंधित क्षेत्राचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तसेच राज्यात २७ हजार ७५२ ग्रामपंचायतीमध्ये पशू सखींची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी येथे केली. जिल्हा परिषदेच्या श्री शिवाजी सभागृहात जिल्ह्यातील सात पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जि.प अध्यक्ष उमा तायडे, उपाध्यक्ष मंगला रायपुरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दिनकर देशमुख, समाजकल्याण सभापती डॉ. गोपाल गव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, पशुसंवर्धन विभागाच्या अमरावती विभागाचे सहआयुक्त डॉ. प्रकाश चव्हाण, उपायुक्त डॉ. विलास जायभाये, दत्ता खरात, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील पसरटे, आएसओ संस्थेचे प्रशांत जोशी आदी उपस्थित होते.आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी संस्थेला कुठल्याही प्रकारचा निधी देण्यात येत नसल्याचे सांगत जानकर म्हणाले, आयएसओ मानांकन हे लोकसहभागातून प्राप्त झाले पाहिजे. या मानांकनानंतर संस्थेकडे नागरिकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. कामाचे मूल्यांकन होते. पशुसंवर्धन म्हणजे शेतकरी कुटुंबाला मिळणारे एएटीएम आहे. प्रत्येक कुटुंबाने शेळी, म्हैस, गाय व कोंबड्या पाळल्यास उत्पन्न हमखास मिळते. त्यामुळे शेतीवरचा भार कमी होऊन कुटुंबाला आर्थिक मदत प्राप्त होते. या विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी नुकतीच एमपीएससीच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय या विभागांतही रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहे. दुधाचे दर सात रुपयांनी वाढविले आहे. याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होत आहे. आता प्रत्येक गावात पशू सखींची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही सखी गावातील महिलांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना पशुसंवर्धन विभागाच्या योजना, जनावरांचे लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाय, बाजारपेठ याविषयी प्रशिक्षित करेल. तसेच गाय, म्हैस यांच्या गर्भारपणामध्ये वेताच्यावेळी काळजी घेण्यासाठी एसएमएस सुविधा देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या नजीकच्या डॉक्टरला एसएमएस केल्यास लगेच वैद्यकीय सुविधा मिळेल. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एन.डी.डी.बी) च्या माध्यमातून जिल्ह्यात दुग्धविकास होणार आहे. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केल्या जाणार आहे. याप्रसंगी उमाताई तायडे यांनी आयएसओ नामांकन मिळविलेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमादरम्यान प्रशांत जोशी यांनी आयएसओ करण्याची प्रक्रिया विशद केली व सातही पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या व्हिडिओ क्लिपचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जयस्वाल यांनी, तर आभार डॉ. चरखे यांनी मानले.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात पशू सखी नेमणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2017 12:17 AM