राहेरी बु : सिंदखेडराजा तालुक्यात घाट नसलेल्या ठिकाणावरून रेतीचे उत्खनन करून शासनाला लाखाे रुपयांचा चुना लावला जात असल्याचा प्रकार समाेर आला आहे. लिलाव झालेला नसतानाही दरराेज शेकडाे ब्रास रेतीचे उत्खनन करून वाहतूक करण्यात येत असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
खडकपूर्णा नदी देऊळगावराजा तालुक्यातून साठेगाव शिवाराकडे सिंदखेडराजा तालुक्यात प्रवेश करते व लिंगा देवखेडपर्यंत व तेथून पुढे लोणार तालुक्याकडे जाते. रेतीघाटांची ठिकाणे निश्चित केलेल्या व लिलावात उल्लेख असलेल्या साठेगाव, हिवरखेड व तढेगाव येथील रेतीघाटातून उपसा केला जातो. त्यापायी शासनाला महसूल प्राप्त होतो. हे सर्व शासकीयस्तरावर होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र, याचाच गैरफायदा घेऊन तसेच यंत्रणेतील काही व्यक्तींना हाताशी धरत रेतीघाट वगळता लिंगा, पिंपळगाव कुंडा, जऊळका, दुसरबीड, ताडशिवणी, राहेरी आदी इतरही अनेक ठिकाणांहून रेतीउपसा करणारी समान यंत्रणा धडाक्यात कार्यरत आहे. त्यासाठी नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी शेती असलेल्या शेतकऱ्यांना काही रकमाही दिल्या जात आहेत व रेती वाहतुकीसाठी शेतातून रस्ते निर्माण केल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात व रेती तस्करांचे फावते. एवढे झाल्यावर रेतीचोरीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेतील संबंधितांना काही रक्कम दिली जात असल्याची चर्चा आहे. यातून हजारो ब्रास रेती चोरीस गेली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. मध्यंतरी, चोखासागर प्रकल्पातून खडकपूर्णा पात्रात पाणी सोडल्यामुळे, रेतीउपशामुळे निर्माण झालेले मोठमोठे खड्डेही झाकले गेले आहेत. यावरही युक्त्याप्रयुक्त्या लढवत पात्रात पाणी नसलेल्या ठिकाणाहूनही धडाक्याने रेतीउपसा सुरू असल्याचे आढळून येत आहे. २१ मे राेजी सकाळीच खडकपूर्णा नदीपात्रात तालुक्यातील ताडशिवणी शिवारात असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला लागूनच असलेला रेतीउपसा करीत ट्रॅक्टरमध्ये भरण्याचे काम सुरू होते. त्याठिकाणी रेतीघाट नसल्याचे पाहून एका व्यक्तीने जबाबदार व्यक्तीला कळवले. त्यानंतर त्या व्यक्तीने तहसीलदार सुनील सावंत यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले असता तलाठी व मंडळाधिकारी यांना ताबडतोब घटनास्थळी पाठवण्याचे सांगितले गेले. परंतु, त्याअगोदरच ट्रॅक्टर रेती भरून निघूनही गेले होते.