बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या काळात स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अवाजवी वापर हा घातक ठरू शकतो. त्यामुळे रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योग्य तो उपचार करणे गरजेचे आहे, असे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी मांडले आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत असून, सीटी स्कॅन, एक्सरेसाठी संदिग्ध रुग्णांची गर्दी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी हे मत व्यक्त केले आहे. साधारणत: सक्रिय रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत जवळपास दहा टक्के व्यक्तींना कोरोनाची गंभीर लक्षणे असू शकतात. अशा स्थितीत ज्या डॉक्टरकडून उपचार करण्यात येत आहे, त्यांनी सूचना केल्यास सीटी स्कॅन करावा. सीटी स्कॅन कोरोना संसर्गाच्या नेमक्या स्थितीसाठी महत्त्वाचा असला तरी तो करण्याबाबत काही प्रोटोकॉल आहे. त्याचे पालन करूनच तो केला जावा.
--बुरशीजन्य आजाराचाही धोका--
स्टेरॉईडचा अवाजवी वापर हा शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. प्रामुख्याने माणसाची प्रतिकार शक्ती क्षीण होते. किडनी व लिव्हरवर विपरीत परिणाम होतो.
बुरशीजन्य आजारही होता. स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढू शकते. त्यातून मग आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सांगितले.
-- सीटी स्कॅनमुळे एक्सरेच्या ३५० पट रेडिएशन--
सीटी स्कॅनच्या वेळी रेडिएशनचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतो. एक्सरेच्या तुलनेत ३५० पट रेडिएशन होते. एक्सरेवेळी ०.०२ एमएसव्ही (मिमी सिव्हर्टस) रेडिएशन निघते, तर सीटी स्कॅन दरम्यान ७ एमएसव्ही निघते. त्यामुळे सीटी स्कॅन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केला जावा. डॉक्टरही आवश्यकता असेल तेव्हाच ते करण्याचा सल्ला देतात.
--जिल्ह्यात दररोज ३०० च्या आसपास सीटी स्कॅन--
कोरोना संसर्गाची व्याप्ती समजण्यास सीटी स्कॅन महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सीटी स्कॅन करावा. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर किमान पाच ते सात दिवसांनी साधारणत: सीटी स्कॅन करावे लागते. त्यामुळे ते न झाल्यास घाबरू नये.
(डॉ. संजय बोथरा, एमडी रेडिओलॉजिस्ट तथा सीटी स्कॅन तज्ज्ञ, बुलडाणा)