साखरखेर्डा : राताळी येथील पंतप्रधान घरकुल यादी आराखडा एक ग्रामसेवक आणि संगणक ऑपरेटर यांनी २४० लाभार्थ्यांचा तयार केला होता. परंतु प्रत्यक्षात १८० नावेच त्या घरकुल योजनेत आल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. ही यादी दुरुस्त करून सर्व २४० लाभार्थ्यांचा समावेश करून प्रसिद्ध करावी, अशी मागणी सरपंच अलका भानुदास लव्हाळे यांनी गुरुवारी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
राताळी येथील घरकुलाची यादी तयार करण्यासाठी एक ग्रामसेवक व ऑपरेटर यांची नेमणूक करण्यात आली होती. त्या वेळी प्रत्येक घरात बसून ऑनलाइन टॅगिंग करण्यात आले. ज्या घरकुलाचे फोटो घेतले ते अपलोड करून त्याची पोचपावती ग्रामसेवकाने दिली. ते अपलोड झाले किंवा नाही ते ऑपरेटर व ग्रामसेवक यांनाच माहीत होते. आता प्रत्यक्षात राताळी येथील २४० घंराची जीओ टॅगिंग करण्यात आली आणि आता ऑनलाइन यादी जाहीर झाली. त्यामध्ये राताळी येथील फक्त १८० घरकुले ऑनलाइन दिसत आहेत. यादीमधील जवळपास ६० लोकांना यादीतून वगळण्यात आले आहे. त्या वगळण्यात आलेल्या अनेक लोकांजवळ एक गुंठासुद्धा जमीन नाही. अत्यंत गरजू लाभार्थी या यादीत ऑनलाइन दिसत नसल्याने ही खरी चूक ऑपरेटरची आहे की, आणखी खोडसाळपणा करून त्या लाभार्थ्यांना वगळले, याची चौकशी करून वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना यादीत सहभागी करून घ्यावे, या मागणीचे निवेदन गुरुवारी राताळी येथील सरपंच अलका लव्हाळे यांच्या वतीने भानुदास लव्हाळे यांनी सिंदखेडराजा येथील गटविकास अधिकारी घुनावत यांना दिले.
केवळ राताळी या गावाच्या यादीचाच प्रश्न नाही तर संपूर्ण जिल्हाभरात निर्माण होणार आहे. जसजशी लाभार्थ्यांना ऑनलाइन यादी पाहावयास मिळेल त्या वेळी त्या गावाच्या सरपंचाची चूक नसतानाही गावकऱ्यांचा रोष सरपंच व सदस्य यांच्यावर येणाऱ असल्याचे चित्र आहे.
फोटो : निवेदन देताना भानुदास लव्हाळे.