- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमांचे आॅनलाइन प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू कोरोनामुळे अनेक विद्यार्थी मुदतीमध्ये प्रवेश घेऊ शकले नाही. त्यामुळे आॅनलाइन प्रवेशासाठी १५ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व कृषी शिक्षणक्रमास वगळण्यात आले आहे; बी.एड् प्रथम वर्ष, एमबीए या शिक्षणक्रमासही मुदतवाढ देण्यात आलेली नाही.कोरोना विषाणू संसर्गामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. शाळा, महाविद्यालय बंद असले, तरी आॅनलाइन शैक्षणिक सत्र सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे यंदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा मुक्त विद्यापीठाकडे कल दिसून येत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांसाठी विविध शिक्षणक्रमाचे आॅनलाईन प्रवेश २१ जुलै २०२० पासून सुरु झाले होते. विनाविलंब प्रवेश घेण्यासाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. यापूर्वीही मुदतीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले नाही, विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता मुदत वाढत देण्यात आली होती. ३० सप्टेंबरची मुदत आता संपुष्टात आलेली आहे. राज्यभर कार्यरत असलेली अभ्यासकेंद्र आणि विद्यार्थ्यांची मागणी तसेच ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी आॅनलाईन प्रवेशअर्ज भरण्याची मुदत पुन्हा १५ आॅक्टोबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतू या मुदतवाढीमध्ये बी.एड. प्रथम वर्ष, एम.बी.ए. व सर्व कृषी शिक्षणक्रमास वगळण्यात आले आहे. यामुळे सर्व कृषी शिक्षणक्रम, प्रथम वर्ष बी.एड्, प्रथम वर्ष बी.एड. (विशेष शिक्षण) आणि प्रथम वर्ष एम.बी.ए. या शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार नाही.
मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश मुदतवाढीत कृषी शिक्षणक्रमास वगळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 5:17 PM