बुलडाणा जिल्ह्याचे शेवटचे टोक व विदर्भ, मराठवाड्याचे सीमेलगत असलेले खापरखेड लाड ते किनगाव जट्टू हे अंतर तीन किलोमीटर असून, काही दिवसांपूर्वी पाचशे मीटर रस्त्याचे डांबरीकरण झालेले असून, अडीच किलो मीटर रस्त्याचे डांबरीकरण होणे बाकी आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत, तर दगड उघडे पडले असल्याने सायकल व इतर वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खापरखेड लाड या गावाचे किनगाव जट्टू गावाशी राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक संबंध असून, खापरखेड लाड हे गाव किनगाव जट्टू ग्रामपंचायतीला संलग्न आहे. येथून एक सदस्य दर पंचवार्षिक योजनेला किनगाव जट्टू ग्रामपंचायतीवर निवडून जातो. खापरखेडा लाड गावाला लागूनच खडक पूर्णा नदी असल्याने शासनाच्या वतीने खडक पूर्णा नदी पात्रातील वाळू उपसा करून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. किनगाव जट्टू गावाला आल्याशिवाय येथील नागरिकांना कुठेही जाता येत नाही. त्यामुळे हा रस्ता महत्त्वाचा आहे.
नागरिकांना व आजारी रुग्णांना प्रथमोपचार घेण्याकरिता किनगाव जट्टू येथे येण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागत असल्याने या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जि.प.चे कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर सहदेव लाड यांच्यासह लोणार तालुका अध्यक्ष अनिल मोरे, उपाध्यक्ष अनिल लांडगे, युवा तालुकाध्यक्ष संजय चाटे, भागवत मुर्तंडकर, विकास मुळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
याआधी केले होते आंदोलन
खापरखेड येथे वर्ग चारपर्यंत शाळा असून, पुढील शिक्षणाकरिता येथील विद्यार्थ्यांना किनगाव येथे यावे लागते. या रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण होण्याकरिता येथील जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद येथे रस्त्याकरिता एक दिवस शाळा भरून आंदोलन केले होते. नागरिकांनीसुद्धा जिल्हा परिषदेसमोर चिखल तुडवा आंदोलन केले होते. तसेच उपोषणसुद्धा केले होते. तरीही या रस्त्याचे डांबरीकरण अद्यापही झाले नाही.