महा-डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ 'एकाच अर्जाद्वारे' देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. दरम्यान, या पोर्टलवर 'शेतकरी योजना' या शीर्षकांतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधाअंतर्गत लाभार्थींना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेतील सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी आदी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे होती. मात्र, आता त्यास मुदतवाढ देण्यात आली असून बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी २० मे पर्यंत अर्ज सादर करावेत. महा-डीबीटी संकेतस्थळावरील 'शेतकरी योजना' हा पर्याय निवडून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदी माध्यमातून संकेतस्थळावर अर्ज करू शकतील. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर बियाणे या घटकासाठी लाभ मिळण्यासाठी २० मे पूर्वी अर्ज करावेत, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी केले आहे.
महा-डीबीटी पोर्टलवर बियाण्यांसाठी अर्ज स्वीकृतीस मुदतवाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:34 AM