लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: महामार्गाचे बांधकाम अतिशय सुमार दर्जाचे होत असल्याची ओरड कायम असतानाच, महामार्गावरील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना तसेच शेतरस्त्यांना वगळून विस्तारीकरण केल्या जात आहे. त्यामुळे महामार्गावरील अनेक गावांमध्ये रस्ता कामाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.खामगाव-बुलडाणा-अजिंठा महामार्गाचे विस्तारीकरण करताना महामार्गावरील विविध गावांना जोडणारे जोड रस्ते आणि शेत रस्त्यांबाबत कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना खोदकामातून आपली वाहने बाहेर काढावी लागतात. गावातून महामार्गावर वाट काढताना प्रामुख्याने शेतकऱ्यांना तसेच शेतमजुरांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महामार्गावरील शिरसगाव, गोंधनापूर, कंझारा, रोहणा आदी ठिकाणचे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण (पीडब्ल्यू डी)चे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.
निकृष्ट दर्जाच्या रस्ता कामाविरोधात आंदाेलन !खामगाव-बुलडाणा-अंजिठा महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील विविध गावांमधील शेतकरी सामान्यांमध्ये प्रचंड रोष खदखदत आहे. शेतकऱ्यांनाही त्रास होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लवकरच रस्ता कामा विरोधात जनआंदोलन उभं राहणार असल्याची चर्चा आहे.रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची गरज आहे.
रस्त्याचे विस्तारीकरण करताना शेत रस्त्याजवळ पोच रस्ता ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करताना त्रास होतो. तसेच खोल खड्डयांमुळे जनावरे खड्ड्यात पडून जखमी होत आहेत.- अनंता पाटीलशेतकरी, दिवठाणा.