बुलडाणा : नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व बिंबविण्यासाठी केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सूचनेनुसार ‘फिट इंडिया’ मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीची चाचणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी नाेंदणी करण्याची मुदत १० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली असून, यापुढे मुदत वाढवून देण्यात येणार नाही. त्यामुळे शाळांनी नोंदणी न केल्यास त्याला शाळाच जबाबदार राहतील, असा इशारा बुलडाण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी दिला आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीची चाचणी घेऊन शाळांनी त्याबाबत फिट इंडिया पोर्टल किंवा ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या ‘ॲप’च्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले जाणार आहे. तसेच ‘खेलो इंडिया’च्या ॲपवर पहिली ते बारावीच्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकानी नोंदणी करावयाची आहे. शाळेत शारीरिक शिक्षक उपलब्ध नसल्यास संबंधित प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी या कामासाठी एका सहायक शिक्षकाची नियुक्ती करावी. शाळा जर एक शिक्षकी असेल तर त्याच शिक्षकाने आपली नोंदणी करावी. विद्यार्थ्यांची क्रीडाविषयक प्रशिक्षणे या ‘ॲप’च्या माध्यमातून होणार असल्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास संबंधित संस्था/शाळा व मुख्याध्यापक यासाठी जबाबदार राहतील, असा इशारा जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांनी दिला आहे.