बुलडाणा : आराेग्य विभागाच्यावतीने विविध जागांसाठी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आराेप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच अधिपरिचारिका पदाच्या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न आल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे.त्यामुळे, २८ फेब्रुवारी राेजी झालेली परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आराेग्य विभागाच्या विविध पदांसाठी २८ फेब्रुवारी राज्यभरातील केंद्रावर घेण्यात आली हाेती. औरंगाबाद येथील परीक्षा केंद्रावर एका उमेदवाराने अत्याधुनिक उपकरण वापरल्याचे समाेर आले हाेते. तसेच काही केंद्रावर उशिरा पेपर पाेहचले हाेते. राहुरी येथील परीक्षा केंद्रावरही बाेगस उमेदवाराला पकडण्यात आले हाेते. अधिपरिचारिका पदाच्या परीक्षेत अभ्यासक्रमापासून पूर्णता भिन्न प्रश्नाचा माेठ्या प्रमाणात समावेश हाेता. त्यामुळे, ही परीक्षा रद्द करून नव्याने घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर पंकज जाधव, सुमीत गायकवाड, आकाश इंगळे, निलेश हिवाळे, आशीष इंगळे, अमाेल मानवतकर, अनिल एकडे, अक्षय माेरे आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे.