खामगाव: लोकसभा निवडणुकीसाठी खामगाव विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रात शुक्रवारी सकाळी ७ वाजता मतदान शांततेत सुरू झाले. दरम्यान सकाळी ७:३० वाजता खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील मतदान केंद्रातील एका मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाला. त्यामुळे येथील मतदान प्रक्रीयेत काही काळ व्यत्यय निर्माण झाला होता.
प्राप्तमाहितीनुसार, भालेगाव बाजार येथील मराठी पूर्व जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र क्रमांक १९१ या केंद्रातील एका मतदान यंत्रात अचानक बिघाड निर्माण झाला. मतदान यंत्र चुकीची वेळ आणि तारीख दाखवित होते. त्यामुळे मतदात्यांसह उमेदवारांच्या प्रतिनिधींनी यावर आक्षेप घेतला. काहींनी मतदान चुकीच्या ठिकाणी जात असल्याचाही आरोप केला. सकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला.
खामगाव येथून दुसरे मतदान यंत्र बोलाविण्यात आले. सकाळी ८.४५ वाजता दरम्यान येथील मतदान प्रक्रीया सुरळीत झाली. मतदान यंत्रातील बिघाडामुळे जवळपास सव्वातासाचा वेळ गेल्याची ओरड करीत येथे मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. सकाळी ९ वाजेपर्यंत खामगाव शहरातील सर्वच आणि तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदान शांततेत सुरू होते.