बुलढाणा : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान देऊळघाट येथील ४ उमेदवारांनी खोटी कागदपत्रे वापरून बनावट जात प्रमाणपत्र तयार करत निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करत निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुकीदरम्यान चार उमेदवारांनी हे खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याचे तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. देऊळघाट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकीदरम्यान आरोपी इस्माइल खान मोहम्मद खान, परविनबी जावेद खान, बानोबी सरदार खान, इब्राहिम मोहम्मद खान (सर्व रा. देऊळघाट) यांनी बनावट जात प्रमाणपत्र तयार करून २० जुलै २०१५ ते २ मे २०२३ दरम्यान झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये नामांकन अर्ज दाखल केले व त्या आधारावर निवडणूक लढवत निवडणूक विभागाची फसवणूक केली, अशी फिर्याद बुलढाणा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अमरसिंग वामनराव पवार यांनी बुलडाणा पोलिस ठाण्यात दिली.
त्यावरून पोलिसांनी इस्माइल खान मोहम्मद खान, परविनबी जावेद खान, बानोबी सरदारखान व इब्राहिम मोहम्मद खान यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रल्हाद काटक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करत आहेत.