- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील बहुचर्चित जमीन घोटाळ्यातील एका प्रकरणात बनावट सातबारा तयार करून अस्तित्वात आणण्यात आलेला फेरफार उपविभागीय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविला आहे. परिणामी, संबंधित प्लॉट मुळ मालकाच्या नावे होण्याचा मार्ग मोकळा झाला. तथापि अद्यापही ९३ प्रकरणात फेरफार रद्द करण्याची प्रतीक्षा कायम आहे.खामगावातील प्लॉट खरेदी विक्री घोटाळ्यात मुख्य सुत्रधार निलंबित तलाठी राजेश चोपडे याने अनेक बनावट सातबारा तयार केले. या सातबाराच्या आधारे फेरफार अस्तित्वात आणले. त्यानंतर आपल्या मर्जीतील दलाल पंकज घोरपडे आणि इतरांच्या मदतीने या भूखंडांची विक्री केली. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने साखळी तयार करून कोट्यवधी रुपयांची माया जमा केली. खामगाव शहरातील मोक्याच्या जागा आणि गृहनिर्माण सोसायटी यातील तब्बल ९४ प्रकरणात अनेकांची फसवणूक झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले. घोटाळ्याची व्याप्ती वाढत असल्याचे पुढे येताच महसूल विभागाने या प्रकरणी तलाठी चोपडे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तसेच फसवणूक झालेल्या इतर दोघांनी चोपडे विरोधात फसवणुकीची तक्रार दिली. या तक्रारिंच्या आधारे राजेश चोपडे विरोधात तीन वेगवेगळे फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. सद्यस्थितीत दोन गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.
अखेर फेरफार रद्द!घोटाळा प्रकरणातील क्र. २२२९२(२७/११/२०१८) गाव नमुना ६ फेरफार नोंदवहीतील अ. क्र.१ नुसार फेरफार क्रमांक २२२५ हा वाद जमिनी संबंधि अस्तीत्वात आणण्यात आल्याने सदर फेरफार रद्द करण्यात आला. तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अपिलार्थीचे खरेदी खत क्रमांक १०४१/१९८९ नुसार महसूल अभिलेखात नोंद घेण्याच्या कार्यवाहीचे आदेश उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिलेत.दैनंदिन कामकाज व्हावे!फसवणूक प्रकरणी एक फेरफार रद्दचे आदेश दिले. मात्र घोटाळ्याप्रकरणी तब्बल अद्यापही ९३ प्रकरणी अनेकांना न्यायाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे फेरफार रद्द प्रकरणी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी दैनंदिन कामकाज करून अनेकांना न्याय द्यावा.