लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे: मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये २६ ऑक्टोबर रोजी कुऱ्हा येथील एका व्यक्तीने २०० रुपयांच्या तब्बल १८१ नकली नोटांचा भरणा केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून यातील तिघांना २ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या चौघांनी या बनावट नोटा कोठून आणल्या याचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. दुसरीकडे २६ ऑक्टोबर रोजी कुऱ्हा येथील एका व्यक्तीने बँकेत भरणा करताना दोनशे रुपयाच्या सुमारे १८१ नोटा नकली भरल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कुऱ्हा येथील ज्ञानेश्वर मगनसिंग पेले या व्यक्तीने स्टेट बँकेमध्ये भरणा करण्यासाठी एकूण दोन लाख ६५ हजारांची रक्कम आणली होती. आणलेल्या एकूण ३६५ नोटा पैकी दोनशे रुपयांच्या १८१ नोटा नकली असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्याची तत्काळ नोंद घेत स्टेट बँकेचे व्यवस्थापक राजेश सोनवणे यांनी धामणगाव बढे पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. त्याआधारे धामणगाव बढे पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर पेले यास २६ ऑक्टोबर रोजी अटक केली. तसेच धामणगाव बढे पोलिसांनी कारवाई करत २७ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी आणखी तिघांना अटक केली. यामध्ये विठ्ठल सबरु मंझरटे( वय ४७), राहुल गोटीराम साबळे (वय २४) यांना अटक केली. तसेच चौथ्या आरोपीला अटक प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाने मोताळा तालुक्यात खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेचा तपास धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश जाधव करीत आहे. नकली नोटांची मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता ठाणेदार योगेश जाधव यांनी वर्तवली आहे. त्यादृष्टीने सध्या धामणगाव बढे पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान पाच वषार्पुवी दाताळा येथून बनावट नाेटा प्रकरणात एकाला अटक करण्यात आली हाेती.