लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील कृउबासमधील व्यापाऱ्याकडून ८४ क्विंटल हरभरा घेऊन त्याला खोट्या सह्याचे धनादेश देऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी बऱ्हाणपूरमधील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. येथील कृउबासमधील व्यापारी प्रशांत श्यामराव शेगोकार (वय २७) रा. गजानन कॉलनी यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की २६ एप्रिल २०१७ रोजी दुपारी कृउबासमध्ये बऱ्हाणपूर येथील शुभम संतोष महाजन, राहुल संतोष महाजन व संतोष महाजन या तिघांनी माझ्या मालकीचा ८४ क्विंटल ४० किलो हरभरा विकत घेतला. यावेळी मालाचे पैसे माल पोच झाल्यावर पाठवतो, असे म्हणून दोन धनादेश दिले. मात्र अद्यापपर्यंत पैसे न दिल्याने सदर धनादेश वटविण्यासाठी बँकेत जमा केले असता त्यावर चुकीच्या सह्या असल्याचे समजले. त्यामुळे सदर तिघांनी खोट्या सह्याचे धनादेश देऊन फसवणूक केली. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुद्ध कलम ४२०, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
खोट्या स्वाक्षरीचे धनादेश देऊन हरभरा पळविला!
By admin | Published: July 14, 2017 12:50 AM