बुलडाणा : गावात कोरोना वाढत असल्याने अनेकांनी शेतात संसार थाटण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या भीतीपोटी अनेकांनी काळ्या आईच्या कुशीत आसरा घेतला आहे. शेतात निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करून कोरोनापासून वाचण्यासाठी दुसरे सुरक्षित ठिकाण असूच शकत नाही, असे मत शेतात राहण्यासाठी गेलेल्या कुटुंबांमधून व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता झपाट्याने वाढत आहे. गावागावात कोरोनाने पाय पसरले आहेत. या संसर्गापासून वाचण्यासाठी जो तो प्रयत्न करत आहे. अनेक जण कोरोनापासून दूर धावत आहेत. मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे हे सर्व करूनही जर कोरोना आपल्यापर्यंत पोहोचत असेल, तर सुरक्षित ठिकाणी जाणे अनेकांनी पसंत केले आहे. बुलडाणा तालुक्यासह सिंदखेड राजा, लाेणार, मेहकर या तालुक्यातील अनेक कुटुंबांनी आपल्या शेतात जाऊन राहण्याला सुरुवात केली आहे. या भागातील कुटुंबांनी शेतात झाडाखाली तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्याचे दिसून येते. काहींनी तुरीच्या काड्यांपासून झोपडी बनवलेली आहे. किराणा, कपडे, खाण्यापिण्याचे इतर साहित्य आदी काही जीवनावश्यक वस्तू सोबत घेऊन शेतातच आपला संसार थाटला आहे. कोरोनाच्या या संकटकाळात शेवटी काळी आईचाच या कुटुंबांना आधार मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
पॉझिटिव्ह असलेल्यांनाही आधार
प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला तसा त्रास दिसून येत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घेऊन घरीच वेगळे राहण्याचा पर्याय अनेकांनी निवडलेला आहे. त्यामध्ये काही पॉझिटिव्ह रुग्णांना शेतात ठेवण्यात आले असून, शेताचाच आधार या रुग्णांना होत आहे.
काय म्हणतात शेतकरी....
शेतात राहणाऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत मिळत नाही. दूरवरून पाणी आणावे लागते. साप, विंचू, विषारी किड्यांची भीती आहे, परंतु ही सर्व भीती कोरोनाच्या भीतीपेक्षा कमीच आहे.
प्रशांत इंगळे, शेतकरी
शिंदी गावात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आम्ही शेतात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे.
नीलेश बंगाळे, शेतकरी
पूर्वी शहरातच असुरक्षित वाटत होते. मात्र आता गावातही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावागावात कोरोना रुग्ण सापडत असल्याने आम्ही दिवसभर शेतातच राहतो.
मनोज वानखडे, शेतकरी
गावही वाटू लागले असुरक्षित
सध्या गावागावात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शहराप्रमाणेच आता गावेही ग्रामस्थांना असुरक्षित वाटत आहेत. गावातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता अनेकांनी शेताची वाट धरली आहे. पहिल्याप्रमाणे गावात जंतुनाशक औषधांची फवारणी होत नाही.
६२०५१
एकूण पॉझिटिव्ह
७३४१
सक्रिय रुग्ण
४०६
एकूण मृत्यू