लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेली घरकुले आता फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. त्यासाठी २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या १०० दिवसांच्या कालावधीत राज्यात `महा आवास अभियान (ग्रामीण)` राबवण्यात येत आहे. या अभियानात विविध घरकूल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपक्रम राबवले जातील. सर्वांसाठी घरे-२०२२, या धोरणातून राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, आदिम आवास, अटल बांधकाम कामगार आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या गृहनिर्माण योजना तर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या योजना राबवल्या जात आहेत. यासोबतच २०२०-२१ या वर्षासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचे ४ लाख ५ हजार ७७ घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास ध्येयांमध्ये गृहनिर्माण क्षेत्राचा विकास या बाबीचाही समावेश आहे. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी घरकूल बांधकामांचा वेग वाढवण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यानुसार गेल्या २०१७ पासून मंजूरी आणि बांधकामाला सुरूवात झालेल्या घरकुलांसह आतापर्यंत मंजूर सर्वच घरकुले फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न या अभियानात केला जाणार आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
तीन वर्षांपासून रखडलेल्या घरकुलांचा हफ्ता मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 5:36 PM