चिखली तालुक्यातील अंचरवाडी शिवारातील शेतकरी सध्या रोही आणि हरणांमुळे त्रस्त आहेत. त्यांच्या शेतातील पीक हे वन्यप्राणी नष्ट करीत आहे. त्यातच अंचरवाडी येथील शेतकरी तथा उपसरपंच सुनील परिहार यांच्या मालकीच्या १० एकर शेतात असलेले पीक रोही या वन्यप्राण्यांनी नष्ट केले. या संदर्भात त्यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार करूनही त्याचा पंचनामा वन विभागाने केला नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने चक्क विषाची बाटली घेऊन बुलडाणा वनपरिक्षेत्र कार्यालय गाठत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा अनर्थ टाळला. सोबतच वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांनी या शेतकऱ्याची समजूत घालून त्याचे समाधान केले.
दुसरीकडे, या घटनेचे गांभीर्य पाहता बुलडाणा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी डुकरे, प्रभाकर लोखंडे यांनीही वेळीच या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यास रोखले. दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांनी त्वरित शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आश्वासन दिले. सोबतच वन कर्मचाऱ्यांना पंचनाम्याकामी त्वरित रवाना गेल्यामुळे हे प्रकरण थोडक्यात निवळले. या संदर्भात पोलीस प्रशासनाची त्यांच्या स्तरावरील कारवाई सुरू आहे.