वाशिम : मानोरा तालुक्यातील गव्हा येथील युवा शेतकऱ्याने कर्ज व नापिकीला कंटाळून विष प्राशन करीत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना ३० सप्टेंबरच्या सायंकाळी उघडकीस आली. अशोक वसंतराव खोडे असे मृतकाचे नाव आहे.
शेतकऱ्यांना अनेकवेळा कधी नैसर्गिक तर कधी मानवी संकटांना सामोरे जावे लागते. सततची नापिकी असेल तर कर्जाची परतफेड करणेही अवघड होवून जाते. गव्हा येथील शेतकरी अशोक वसंतराव खोडे ( ३४ ) यांनी शेतीसाठी एका बँकेचे कर्ज काढले होते. मात्र, सततची नापिकी असल्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी? या विवंचनेत ते होते. यातूनच त्यांनी २७ सप्टेंबर रोजी विष प्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अशोक खोडे यांच्या कुटुंबियाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अत्यवस्थ झालेल्या अशोक खोडे यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र ३० सप्टेंबरला सायंकाळी खोडे यांची प्राणज्योत मालवली. मृतकाच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. सततची नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची गव्हा येथील मागील १० दिवसांतील ही दुसरी घटना आहे.