मोताळा : एका ६४ वर्षीय अल्पभूधारक शेतकºयाने विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. तालुक्यातील डिडोळा बु. शिवारात ही घटना घडली आहे.शेतकरी ओंकार सिताराम बोराडे (रा. तिघ्रा ह.मु. मोताळा) हे दोन ते तीन वर्षापासून मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीनजीक वास्तव्याला आहेत. त्यांनी डिडोळा बु. शिवारातील गट नंबर ७४ मधील शेतातील विहिरीत ठिबकच्या नळ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. विहिरीत गळफास घेतल्याने मृतदेहाचा वरील भाग पाण्यावर व कमरेपासूनचा भाग पाण्यात बुडालेला होता. ही घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शेतकरी ओंकार सिताराम बोराडे यांच्याकडे दीड एकर शेती आहे. त्यांच्यावर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी रमेश वासुदेव हागे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गरुड यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड काँस्टेबल मिलींद सोनुने, पोलीस काँस्टेबल संतोष सुरडकर करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 3:22 PM